Coronavirus in Pune : पुण्यात केवळ 10 व्हेंटिलेटर तर 20 ICU बेड शिल्लक ! महापालिका उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

पुणे : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक मोठ्या प्रमाणात संक्रमीत होत आहे. काल एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. राज्यात पुण्यामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होऊ लागला आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना पुन्हा एकदा बेडची शोधाशोध करावी लगात आहे.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागल्याने रुग्णालयातील बेड्स कमी पडू लागले आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार पुणे महापालिकेला शहरात साधारण 2600 बेड कमी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नियोजनाला सुरुवात केली आहे. त्यानुसार आता महानगरपालिका शहरातील सर्व रुग्णालयांचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार आहे, तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक रुग्णांना बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शहरातल्या प्रमुख रुग्णालयांचे तर सर्व बेड पुर्ण भरले आहेत. डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, शहरात साधारण 5008 बेड आहेत. त्यापैकी फक्त 490 बेड शिल्लक आहेत. यामध्ये साधे बेड 243, ऑक्सिजन बेड 217, व्हेंटिलेटर शिवायचे आयसीयु बेड 20 तर व्हेंटिलेटर बेड केवळ 10 शिल्लक आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबरमध्ये प्रशासनाने सर्व रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेतले होते. तेव्हाची आणि आत्ताची आकडेवारी पाहता शहरामध्ये साधारण 2682 बेड कमी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आता खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासंदर्भात माहिती देताना पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले, या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. शहरातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.