इंटरनेटसह विविध समस्यांच्या सुविधांमुळे राज्यातील 27 % विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचे लाभार्थी !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे लॉकडाउनच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणाचा शोधलेला मार्ग पुरेशा सुविधांअभावी अडचणीत आला आहे. तब्बल 1 लाख 67 हजार विद्यार्थ्यांची माहिती संकलित केल्यानंतर त्यातील अवघ्या 27 टक्केच विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावर भिस्त ठेवून सुरू असणारे नियोजन अनेक विद्यार्थ्यांना वंचित ठेवणार आहे.

विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत कायम ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘शाळा बंद पण अभ्यास सुरू’ अशी मोहीम आखली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून शिकवण्यात यावे, असे आवाहनही विभागाने केले आहे. वार्षिक नियोजनानुसार जूनमध्ये पूर्वीप्रमाणे शाळा सुरू होण्याची शक्यता कमी दिसते आहे. अशावेळी ऑनलाईन शिक्षणावर भिस्त ठेवून शिक्षण विभागाचे नियोजन सुरू आहे. मात्र, हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी साधनांची पुरेशी उपलब्धता नसल्याचे दिसत आहे. अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरम या गटाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, अनुदानित आणि विनाअनुदानित 1 हजार 186 शाळांमधील 1 लाख 67 हजार विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार एकूण 45 टक्के पालकांकडे स्मार्टफोन असले तरी त्यातील 27 टक्केच पालकांकडे इंटरनेट आहे.

फोन असलेल्या इतर पालकांनी इंटरनेट घेतले तरीही पन्नास टक्क्यांहून अधिक विद्यार्थी वंचितच राहणार आहेत. जिल्हापरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची अवस्था अधिकच बिकट आहे. जिल्हापरिषदेच्या शाळांमधील 37 टक्के पालकांकडे स्मार्टफोन आहे तर त्यातील 20.88 टक्केच पालक इंटरनेट वापरतात. खासगी विनाअनुदानित शाळांमधल्या 22 हजार 301 पैकी 42 टक्के पालकांकडे स्मार्टफोनला इंटरनेटची जोडणी आहे. या शाळांत शिकणार्‍या 30 टक्के मुलांकडे स्वत:चे फोन आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह धरताना सुविधांचा अभाव असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.