राज्यातील फक्त 30 टक्केच रेस्टॉरंट आणि बार सुरु !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार सोमवार पासून सुरु झाली. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी फक्त ३० टक्केच रेस्टॉरंट आणि बार सुरु झाले. तसेच पहिल्या दिवशी ५० टक्केच ग्राहकांचा प्रतिसाद होता, अशी माहिती ‘आहार’ ने दिली.

राज्य सरकारने अनलॉक ५ मध्ये नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करुन परवानगी दिली. त्यानुसार सोशल डिस्टंन्सिग पालन तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात सोमवारपासून ५०% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु झाले आहेत. तर मुंबईत ३३ टक्के रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहेत. १ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेसह रेस्टॉरंट सुरु केले जातील.

ग्राहकांनी आज जो प्रतिसाद दिला तसेच सात महिन्यांनी पुन्हा सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो, असे आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले. कोरोनाच्या अनुषंगाने नियमावलीचे पालन करत असताना ग्राहक अत्यंत संयमाने सामोरे गेले. नियमावली केवळ ग्राहकांसाठीच नाही, कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हितकारक आहे. अपेक्षेप्रमाणे आज ३० ते ३५ टक्के रेस्टॉरंट आणि बार सुरु झाले. त्यातील कित्येक ठिकाणी ३० ते ४० टक्के कर्मचारी उपलब्ध होते. तसेच पहिल्या दिवशी ५० टक्के ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.

तथापि, मनुष्यबळ कमी असल्याने मेन्यूची संख्या कमी करण्यात आली आहे. रेस्टॉरंट आणि बारची वेळही कमी केली आहे. मात्र, येत्या १५ दिवसांत सर्व पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा आहे. रेस्टॉरंट चालकांनी कोरोनाच्या अनुषंगाने काटेकोरपणे पालन करावे.

पार्सलमध्ये २५ टक्क्यांची घट नोंदवली

मागील काही दिवसांपासून खाद्यपदार्थ फक्त पार्सल देण्यात येत होते. पण सोमवारी हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये बसून जेवता येत असल्याने, जेवण पार्सल नेण्याच्या प्रमाणात २५ टक्क्यांची घट नोंदवली आहे. तसेच सोमवारपासून रेस्टॉरंट आणि बार रात्री १.३० वाजेपर्यंत खुले राहतील. रात्री १२.३० वाजेपर्यंत खाद्यपदार्थ आणि मद्यपानाची शेवटची ऑर्डर देता येणार असल्याची माहिती, ‘आहार’ने दिली.