गाझियाबाद : केवळ ५ हजारात ‘भारताचे नागरिकत्व’ देणारी टोळी गजाआड

गाझियाबाद : वृत्तसंस्था

भारतीय नागरिकत्वाशी संबंधीत कागदपत्रे काढून देणाऱ्या एका टोळीला कविनगर पोलिसांनी अटक केली आहे. केवळ पाच हजार रुपये घेऊन ही टोळी भारतीय नागरिक असल्याचा दाखल देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आत्तापर्यंत 50 ते 60 जणांना बनावट कागदपत्रे काढून दिल्याचे सांगितले आहे. मागील काही दिवसापासून देशात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांंग्लादेशी नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अशाच तीन बांगलादेशी नागरिकांना कविनगर पोलिसांनी अटक केली, त्यावेळी त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाशी संबंधित काही कागदपत्रे सापडली. ही सर्व कागदपत्रे बनावट असून याच्या आधारे एकाने स्वत:चे घरदेखील बांधले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी सकाळी ३ लोकांना संशयास्पद हालचालींवरुन पकडण्यात आले. त्यांची चौकशी केली असता ते बांगलादेशी असल्याचे समोर आले. त्यानंतर अधिक चौकशीत त्यांनी पश्चिम बंगालमार्गे भारतात आल्याचे सांगितले. बंगालमध्ये त्यांनी शैक्षणिक कागदपत्रे तयार करुन घेतली आणि त्याच्या आधारावर इतर कागदपत्रे बनवली असल्याचे आरोपींनी सांगिलते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आलम शेख, नजरुल इस्लाम, इमाम हुसेन अशी आहेत. त्यांच्याजवळ पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड यांसह इतर कागदपत्रेही आढळुन आली आहेत.अशी माहिती कवीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप त्रिपाठी यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आलम शेख हा इंदिरापुरम या ठिकाणी राहत होता. त्याच्याजवळ असलेले कर्नाटकचे अोळखपत्रही जप्त करण्यात आले असून, तो गेल्या 17 वर्षापासून भारतात वास्तव्यास आहे. एवढेच नाहीत तर त्याने आपले घर देखील बांधले आहे. बांग्लादेशातून आलेल्या व्यक्तींना तो आपले नातेवाईक असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे तयार करत होता. ताब्यात घेतलेले दोघेही आलमसोबत राहत होते.