अख्ख्या विमानात एकच प्रवासी ; तिने घेतला स्पेशल फ्लाईटचा आनंद

मनिला : वृत्तसंस्था – एकाच प्रवाशाला घेऊन जाणारी गाडी तुम्ही क्वचितच पाहिली असेल. त्यातही जर खासगी वाहतूक करणारे असतील तर, प्रवासी एकमेकांच्या मांडीवर बसायचेच बाकी राहतात. याला कारणही तसेच आहे की, जर प्रवासी कमी असतील तर गाडी मालकाला ते आर्थिकदृष्ट्या न परवडणारे असते. तुम्ही कधी असे ऐकले आहे का की, एका विमानाने एका प्रवाशाला घेऊन उड्डाण केले. कारण अशीच एक घटना समोर आली आहे. एका विमानात चक्क फक्त एकच महिला होती. या स्पेशल अनुभवामुळे तिला असे वाटेल की, जणू हे विमान तिच्या एकटीच्याच प्रवासासाठी आहे. फिलीपिन्समधील ही घटना आहे. अख्ख्या विमानात ती एकटीच प्रवासी होती!
या महिलेचे नाव लोइसा एरिस्पे. ज्या विमानात ती एकटीच प्रवास करत होती ते विमान तब्बल 199 सीट असणारे होते. जेव्हा ती  दवाओ ते मनिला असा हा प्रवास करण्यासाठी विमानतळावर दाखल झाली तेव्हा तिला एकटीलाच हा प्रवास करायचा आहे हे तिला माहीतच नव्हते. लोइसाशिवाय तिच्या फ्लाईटमध्ये सात क्रु मेम्बर होते. त्यांनीही तिच्यासमवेत फोटो टिपून घेतले व तिचा हा प्रवास आनंदी होण्यासाठी मदत केली.
लोइसा एरिस्पे विमानात आल्यानंतर तिला विमानातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले की, ती एकटीच प्रवासी आहे. जेव्हा तिने हे ऐकले तेव्हा सुरुवातीला तिला जरा भीतीच वाटली. परंतु नंतर भीती दूर सारून तिने  ‘स्पेशल फ्लाईट’चा आनंद लुटला. आपण स्वतःच्या खासगी विमानानेच प्रवास करीत आहोत की काय, असे तिला वाटू लागले. तिने या फ्लाईटचा व्हिडीओ बनवला, मनसोक्‍त सेल्फी टिपल्या आणि ते सर्व (अर्थातच!) सोशल मीडियात शेअर केले.