पोलिस मुख्यालयातील कर्मचारीच निघाला बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातील आरोपी, प्रचंड खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – बोगस क्रीडा प्रमाणपत्र बनवून लोकांना क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरी लावून देणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला असून अटक सत्र सुरूच आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे सदर आरोपी हा ठाणे शहर मुख्यालयात पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.

तपासादरम्यान आरोपीने नागपूर विभागात तिघांना आईस हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचे बनावट क्रीडा प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. त्याने आतापर्यंत 103 जणांना प्रमाणपत्र दिले असून त्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. पोलीसच या घोटळ्यात सहभागी असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे.

प्रशांत चव्हाण असे अटक केलेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारास अंकुश राठोड आणि भाऊसाहेब बांगर यास मानकापूर पोलिसांनी औरंगाबाद येथून यापूर्वीच अटक केली आहे. तसेच या प्रकरणी अटक केलेले 12 आरोपी नागपूर, भंडारा, सांगली, औरंगाबाद, नगर, बीड, परभणी, नांदेड आणि आता ठाणे येथील आहेत. तर आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उपसंचालक अविनाश पुंड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता.

या घोटाळ्यात 14 ऑक्टोबर 2020 रोजी सेवानिवृत्त क्रीडा उपसंचालक सूभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना अटक केली होती. रेवतकर यांच्या घरात महाराष्ट्र शासन लिहिलेली खासगी कार व लाल दिवे सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्याकडूनच औरंगाबाद येथील रहिवासी अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगर यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. आतापर्यंत नागपूर पोलिसांनी क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 12 जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.