पुणे महापालिकेचा नवा नियम ! ‘कोरोना’मुळं घरीच मृत्यू झाला तर नातेवाईकच करतील अंत्यसंस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महानगरपालिकेनं कोरोना रुग्णांच्या संदर्भात एक नवीन नियम आणला आहे. घरात उपचार घेत असताना जर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांनाच सर्व नियम पाळून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. यासाठीची सर्व प्रक्रिया नातेवाईकच पूर्ण करतील. गाडीची सुविधा फक्त पुरवली जाईल. एका वृत्तामुळं महापालिकेच्या या नव्या नियमाची माहिती समोर आली आहे.

राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट खूपच धोकादायक ठरताना दिसत आहे. जशी जशी कोरोनाची स्थिती बदलत आहे त्याप्रमाणेच आता नियमांमध्येही काही बदल होताना दिसत आहे. पू्र्वी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, तर रुग्णालयातील कर्मचारीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करत होते. कुटुंबातील मोजक्या तीन-चार जणांनाच यासाठी जाता येत होतं. मृतदेहामुळं कुणा इतरांना कोरोनाची लागू होऊ नये असा या मागील हेतू होता. आता मात्र नियमात बदल झाला आहे.

पुणे शहरात घरात उपचार घेत असताना जर एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला तर कुटुंबीयांनाच सर्व नियम पाळून त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची पूर्तता देखील त्यांनाच करावी लागणार आहे. यानुसार कुटुंबीयाना 4A आणि form 2 भरावे लागणार आहेत.

PPE किट, बॉडी बॅग मिळणार

महापालिका प्रशासनाच्या वतीनं मृतदेह ठेवण्यासाठी बॉडी बॅग आणि 4 पीपीई किट देण्यात येतील. अंत्यसंस्कारादरम्यान कुणाला कोरोनाची लागण होऊ नये हा यामागील हेतू आहे. कुटुंबातील 4 सदस्यांनी पीपीई किट परिधान करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. यासाठीची सर्व प्रक्रिया आता घरातील सदस्यांनाच पार पाडावी लागणार आहे. मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी गाडीची सोय करण्यात येणार आहे. यासाठी पुणे मनपानं संपर्क नंबर दिले आहेत. 02024503211, 02024503212 आणि 9689939628 या नंबरवर संपर्क केला जाऊ शकतो. यावर कॉल करून गाडीची सोय केली जाऊ शकते.