लक्ष्मण जगताप यांच्या विजयाचे फक्त लीड मोजायचे : पंकजा मुंडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधकांना मोठा दणका देणार आहेत. जगताप यांना विजयासाठी केवळ लीड मोजायचे असून ते दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम विश्वास राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (दि. १३) थेरगाव येथे व्यक्त केला.

चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप -शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजप खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक अभिषेक बारणे, कैलास बारणे, नगरसेविका माया बारणे, अर्चना बारणे, झामाबाई बारणे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे सर्व नगरसेवक, भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीला उमेदवार सुद्धा देता आले नाहीत. त्यामुळे निवडणुकीत त्यांचा आधीच पराभव झालेला आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या धास्तीनेच विरोधकांना उमेदवार सापडत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचा विजय निश्चित आहे.

त्यांनी मिळालेल्या मतांचे फक्त लीड मोजायचे आहे. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना जेवढे मतदान पडणार आहे, तेवढ्या मताधिक्याने ते निवडून येणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील लोक अत्यंत हुशार आहेत. या हुशार लोकांनी लोकसभेला जेवढा दणका दिला त्यापेक्षा मोठ दणका विधानसभेला देणार आहेत. यामुळे लक्ष्मण जगताप हे पुन्हा एकदा आमदार होणार हे नक्की आहे.

Visit : Policenama.com