आता शाळेत जायची गरज नाही,  महाराष्ट्रात होणार ओपन एसएससी बोर्ड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कला, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या १० जानेवारीला राज्यात ओपन एसएससी बोर्ड सुरू करण्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. कला, क्रीडा तसेच इतर क्षेत्रात रस असलेल्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रमामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
तावडे म्हणले की, कलाकार, खेळाडू आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी हवा तितका वेळ देता यावा. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ त्यांच्या आवडत्या क्षेत्रात आणि सरावासाठी देऊ शकतात. डिसेंबर आणि जून महिन्यात हे विद्यार्थी थेट परीक्षेला बसू शकतात. नव्या ओपन एसएससी बोर्डांतर्गत विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.
या विद्यार्थ्यांना वयाच्या दहाव्या वर्षी इयत्ता पाचवीची परीक्षा देता येऊ शकते. वयाच्या १३ व्या वर्षी आठवी आणि वयाच्या १५ व्या वर्षी १० ची परीक्षा देता येईल. ओपन एसएससी बोर्डाद्वारे या परीक्षा घेतल्या जातील.
कला, क्रीडा अशा क्षेत्रात कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या मुलांना क्रमिक अभ्यासक्रमामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत करणं कठीण होऊन जातं. खेळ, कला आणि अभ्यास या ओढाताणीत मुलांचं दोन्हीकडे नुकसान होतं. मात्र, ओपन एसएससी बोर्डाचा पर्याय उपलब्ध झाल्याने कला आणि क्रीडा क्षेत्रात रस असणाऱ्या मुलांना तसेच दिव्यांग मुलांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us