मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही लवकरच ‘ऑपरेशन लोटस’, पंकजा मुंडेंनी दिले ‘संकेत’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अशीच परिस्थिती निर्माण होणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. तर मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात देखील लवकरच ऑपरेशन लोटस होईल असा गौप्यस्फोट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ऑपरेशन हे सांगून होत नसतं. लवकरच होईल आणि नंतर सर्वांना कळणार आहेच. तसेच राज्यात मध्यप्रदेशच्या धर्तीवर आता लवकरच ऑपरेशन लोटस यशस्वी करू, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.

धनंजय मुंडे प्रादेशिक पक्षाचे नेते
धनंजय मुंडे यांना खोचक टोला लगावताना पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि धनंजय मुंडे हे एका प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत. त्यांना अशा राष्ट्रीय पक्ष्याच्या भूमिका समजणे शक्य नाही आणि त्यांच्याही पक्षात असे ऑपरेशन अगोदर झालेले आहेत, त्यामुळे त्यांना चांगलेच माहित असल्याचा टोला त्यांनी लगावला. मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस यशस्वी झाले असून काँग्रेसचे बडे नेते ज्योतिरादित्य सिंधीया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु होती याला पंकजा मुंडे यांनी पुष्टी दिली आहे.