धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्राची ओळख देण्याची धडपड सुरू : नयनतारा सहगल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘प्रतिगामी विचार करणाऱ्या ‘नवीन भारता’मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही. मते मांडण्याचा सामान्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. सरकारविरोधात लिहिणाऱ्यांच्या हत्या होत आहेत, असं म्हणत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका नयनतारा सहगल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. भाई वैद्य फाउंडेशन यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार’ सहगल यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या स्वतः उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांनी दृकश्राव्य पद्धतीने आपले मनोगत यावेळी मांडले.

देशात पसरवली जाणारी विषमता हिंदू आणि इतर अशी नसून हिंदुत्वमानणारे आणि न मानणारे अशी आहे. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र अशी ओळख देण्याची धडपड सुरू आहे. हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे, अशी टीका सहगल यांनी यावेळी केली. सरकारला पाठिंबा देणारे आणि त्यांच्या बाजूनेच बोलले जावे आणि लिहिले जावे, अशी सक्ती केली जात आहे. सरकार नामक व्यवस्थेने लोकशाही आणि तिच्याशी संबंधित मूल्यांची पायमल्ली केली आहे, असंही त्यांनी म्हटलं.

एकीकडे सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणायचे आणि दुसरीकडे स्वातंत्र्याची गळचेपी करायची, हे विसंगत आहे. लोकशाहीप्रमाणेच धर्मनिरपेक्षताही धोक्यात आली आहे. भारतात सर्वकाही आलबेल आहे असे, भासवले जात आहे. प्रत्यक्षात देशातील अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत. आमच्या सोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे वातावरण अनुभवण्यास मिळत आहे. बुद्धिभ्रम करण्याचे षड्‌यंत्र सुरू आहे,’ अशी घणाघाती टीका सहगल यांनी केली.