महापौर पदाच्या प्रबळ दावेदारामुळे विरोधकांकडून प्रयत्न सुरु : नगरसेवक काटे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात माझ्या कुणबी जात वैधतेची फेर तपासणी करावी असा आदेश जात पडताळणी समितीला दिला आहे. हा आदेश देताना माझे यापूर्वीचे जात वैधता न्यायालयाने रद्द केलेले नाही. मात्र माझे राजकीय विरोधक या निकालाचा चुकीचा अन्वयार्थ लावून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी महापौरपदाचा प्रबळ दावेदार असल्यामुळेच माझे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांकडून हे प्रकार सुरु असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

[amazon_link asins=’B017OTH15G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37972873-7d32-11e8-9881-bdd81c82f5d2′]

शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, सत्य कधीही लपून राहत नाही. आपली कागदपत्र खोटी असती तर उच्च न्यायालयाने आपले पद रद्द केले असते. आता जात वैधता पडताळणी समितीसमोर सर्व कागदपत्र सादर करुन त्याची सत्यता पडताळणी करुन घेवू. फेरपडताळणीत सत्य सर्वांसमोर येईलच. १५ जून २०१८ उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुन माझे राजकीय विरोधक गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहे.

जात वैधतेची फेरपडताळणी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जात वैधता पडताळणी समितीला दिला आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रहाटणी-पिंपळे सौदागर (प्रभाग क्रमांक २८) मधून ओबीसी राखीव प्रवर्गातून मी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. मात्र, बनावट कुणबी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप करत राजकीय विरोधकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन (नं. 556/2017 दिनांक 05/01/2017 ) दाखल करण्यात आली आहे. त्यावर उच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली, यामध्ये उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत जात वैधतेची फेर पडताळणी करण्याचे आदेश जात वैधता पडताळणी समितीला दिले आहेत. तसेच जात दाखल्यासंदर्भात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने योग्य कागदपत्रांच्या आधारे तपशीलवार कारण मिमांसा दिली नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने तपशीलवार कारण मिमांसा करुन निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.