‘वाणिज्य’च्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्यभिमुख शिक्षणाची संधी : डॉ. नितीन करमळकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‘आयसीएआय’ यांच्यात झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, तसेच अर्थविषयक कौशल्य, रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी मिळणार आहे. शिकतानाच विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक कंपन्या, सनदी लेखापाल संस्था यामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी नवनवे उपक्रम, अभ्यासक्रम, मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रशिक्षण देण्यास मदत होणार आहे,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसीपीपीयू) आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि ‘आयसीएआय’चे उपाध्यक्ष सीए निहार जांबूसरिया यांनी या कराराचे आदानप्रदान केले. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘एओएसएसजी’चे अध्यक्ष डॉ. एस. बी. झावरे, ‘डब्ल्यूआयआरसी’चे अध्यक्ष सीए ललित बजाज, ‘आयसीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव व खजिनदार सीए काशीनाथ पठारे, सीए यशवंत कासार, सीए मुर्तजा काचवाला, उद्योग-व्यवसाय समितीचे अध्यक्ष सीए राजेश शर्मा, सीए हंस राज चुग, एम. एस. जाधव, उदय गुजर, विद्यापीठातील नवोपक्रम, नावसंशोधन आणि साहचर्य मंडळाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, सिनेट सदस्य प्रसेनजीत फडणवीस, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर आदी उपस्थित होते.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “समाजात होणारी स्थित्यंतरे विद्यापीठातही होणे गरजेचे आहे. कोविड काळात परीक्षा घेणे हीच एक मोठी परीक्षा होती. या काळात अनेक त्रुटींबद्दल विचार करायला वेळ मिळाला. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या बरोबर करार करत आहोत. एकमेकांच्या सहकार्यातून नवीन उपक्रमांना मूर्त स्वरूप येत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल आहे.”

सीए निहार जांबूसरिया म्हणाले, “विद्यापीठासोबत होत असलेला हा करार ऐतिहासिक घटना आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक ज्ञानाची जोड मिळायला हवी. या घटनेमुळे विद्यार्थी दशेपासूनच कंपन्यांमध्ये जाऊन काम करता येईल. त्यातून अनुभव संपन्नता वाढेल. सनदी लेखापालांनाही वाणिज्य शाखेत डॉक्टरेट व अन्य शिक्षण घेण्यासाठी नवे व्यासपीठ मिळेल.”

“विद्यापीठात ४० टक्के विद्यार्थी वाणिज्य शाखेचे आहेत. या करारामुळे विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढेल. प्लेसमेंट साठी मदत होईल. पाठ्यपुस्तक आणि प्रात्यक्षिक ज्ञान यामधील पोकळी भरून निघेल. प्राध्यापक आणि विद्यार्थी दोघांसाठी चांगले उपक्रम राबविण्यात येतील,” असे डॉ. एन. एस. उमराणी यांनी नमूद केले. सीए चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले की, वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद असतो. मात्र, त्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाचा अभाव दिसून येतो. सनदी लेखापालांच्या मदतीने या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान व कार्यानुभव मिळेल.

सीए अभिषेक धामणे म्हणाले, “विद्यापीठाच्या सहकार्याने नवनवे अभ्यासक्रम विकसित करण्यासह फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, इंटर्नशिप प्रोग्रॅम, वेबिनार्स, सेमिनार्स घेतले जाणार आहेत. ‘आयसीएआय’ या कामात पुढाकार घेत आहे.” सीए अभिषेक धामणे यांनी सूत्रसंचालन केले. विशाल दोशी यांनी आभार मानले.