राज्यपाल नियुक्त 12 जागा : सत्ताधार्‍यांकडून निष्ठावंतांपेक्षा आयारामांना संधी

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी ( Governor Appointment) अखेर महाविकास आघाडी सरकारने बारा जणांच्या नावाची शिफारस यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे सुपूर्द केली. सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 4 उमेदवारांना संधी दिली आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीचे मंत्री शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही यादी दिली.मात्र यात निष्ठावंतापेक्षा आयारामांनाच संधी देण्यात (opportunity-ruling-party-12-governor-appointed-seats-loyal-waiting) तिन्ही पक्षांनी धन्यता मान्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीकडून या 12 जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. राज्यपाल कोश्यारी ही 12 नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री परब यांनी व्यक्त केला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती, मात्र त्यांना भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.शिवसेनेने रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुनील शिंदे, युवासेनेचे राहुल कनाल, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर यांना अजूनही प्रतिक्षा यादीत राहावे लागणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे उभे राहिल्याने स्थानिक आमदार सुनील शिंदे यांना मतदारसंघ सोडावा लागला होता.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आयारामांना संधी दिली आहे. अलीकडेच भाजपाचा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले खडसेंच्या नावाची शिफारस केली आहे. तर यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती. भिंगे धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात.

दरम्यान काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. यात चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. काँग्रेसने राज्यपाल नियुक्त जागेसाठी अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून आयारामांना संधी देऊन निष्ठावंतांना प्रतिक्षा यादीत कायम ठेवल्याची चर्चा आहे.