आगामी काळात एकट्याला सत्ता स्थापण्याची संधी, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन –   आगामी काळात राज्यात एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

फडणवीस हिंगोली जिल्ह्यात लग्न सोहळ्यासाठी जात होते. त्यादरम्यान वाशीम येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या घरी कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर दोन जागा मिळविल्या आहेत, तसेच हैदराबाद येथे झालेल्या निवडणुकीतही मोठे यश मिळाल्याचे फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले आहे.

फडणवीस-शेलार जोडगोळी हैदराबाद मोहिमेवर

देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार ही जोडगोळी महाराष्ट्रात रणनीती आखते हे एव्हाना अनेक निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. मात्र, आता त्यांच्या रणनीतीचा फायदा भाजप राष्ट्रीय स्तरावर घेत आहे. फडणवीसांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारीपद भूषवले, तिथे भाजपने विजय मिळवला. त्यानंतर लगेचच फडणवीस आणि आशिष शेलार हैदराबाद मोहिमेवर गेले आहेत.

भाजप हैदराबादमध्ये 4 वरून 48 जागांवर

हैदराबादची निवडणूक ही भाजपने सर्वशक्तीने लढली असली तरी ती शिवसेनेसाठी लिटमस टेस्ट म्हणता येईल. कारण पाच वर्षांपूर्वी केवळ 4 जागा जिंकणाऱ्या भाजपने हैदराबादेत 48 जागा जिंकून, मुंबईतील लढाईसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. जर हैदराबादसारख्या निवडणुकीत अमित शाह, जे. पी. नड्डा, योगी आदित्यनाथ हे मैदानात उतरू शकतात, तर आशिया खंडातील सर्वांत मोठी महापालिका असलेल्या मुंबईच्या निवडणुकीत कोण कोण उतरू शकत याचा अंदाज बांधता येईल.

मुंबई महापालिका निवडणुकीत फडणवीस, शेलार, भातखळकर यांची फौज उतरणार
जे देवेंद्र फडणवीस बिहार आणि हैदराबादच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरू शकतात, ते मुंबई महापालिका निवडणुकीत पायाला भिंगरी बांधणार हे निश्चित आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस दुसरीकडे आशिष शेलार आणि नव्याने जबाबदारी सोपवलेले अतुल भातखळकर अशी भाजपची फौज ग्राउंडवर असेल. त्यांच्या दिमतीला महाराष्ट्रातील 105 आमदार, भाजपचे खासदार, आजूबाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रातील मंत्री, अमित शाह, योगी आदित्यनाथ, जे. पी. नड्डा हे असतीलच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरले तर आश्चर्य वाटायला नको.