‘राष्ट्रीय राजकारणात महिलांना आहे ‘एवढी’ संधी तर जगात… – पंकजा मुंडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  जगात अनेक देशांमध्ये राजकारणात महिलांना 52 टक्के आरक्षण आहे, परंतु आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर फक्त 2 टक्के महिला राजकारणात आहेत. राष्ट्रीय राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत आपल्याकडे विचार झालेला नाही, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे-पालवे यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय महिला संसदेत ‘राजकीय नेतृत्व (महिला , शक्ती, आवड आणि राजकारण) या विषयावर मुंडे बोलत होत्या. यावेळी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, माजी खासदार मीनाक्षी नटराजन, डॉ. हर्षिता पांडे, समाजसेविका डॉ. राणी बंग, डॉ. गिरीश कुलकर्णी, आमदार प्रणिती शिंदे, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डी. पी. आपटे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रवींद्रनाथ पाटील, सहयोगी संचालिका प्रा. डॉ. शैलश्री हरिदास उपस्थित होते.

यावेळी मुंडे म्हणाल्या की, महात्मा गांधी म्हणायचे, की महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा कमी नाहीत. जन्मापासून प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांनी कधीही कमजोर समजू नये. त्यांना जन्मानंतर पोषण, शिक्षण आणि त्यानंतर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. तर ॲड. ठाकूर म्हणाल्या, ‘सतत संघर्ष करणाऱ्या महिलांना आर्थिक साक्षर करणे गरजेचे आहे. बऱ्याच पदांवर पुरुषी वर्चस्व दिसते त्याला तडा देत महिलांना समोर आणणे आता आवश्‍यक आहे. आमदार शिंदे म्हणाल्या, आधुनिक काळात महिलांनी स्वतःचे मानसिक आरोग्य चांगले ठेवावे त्यासाठी कार्य करावे.