आता ‘महाविकास’आघाडी तालुका, जिल्हास्तरावरही, भाजपची गणितं बिघडणार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी राज्य स्तरावर झालेली महाविकास आघाडी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरही पोहोचत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमादारांच्या घेतलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. काही लोकांनी आधीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांची आणि स्थानकि पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच स्थानिक पातळीवर ही आघाडी सत्ता स्थापन करेल, अशी माहिती शरद पवार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

शरद पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते नागपूर येथे विधीमंडळ अधिवेशनादरम्यान आले आहेत. येथील देवगिरी या शासकीय निवास्थानी त्यांनी पत्रकारांशी अनौपचरिक संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, मंगळवारी नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली. आगामी निवडणुकांत तिन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांनी एकूणच अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदांच्या वाटपाची सकारात्मक बोलणी करावी आणि त्यादृष्टीने सत्ता स्थापन करावी, असे मी बैठकीत सांगत होतो. त्यावर बहुतांश आमदारांनी याबाबतची कार्यवाही आधीपासूनच सुरू झाल्याचे सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जिल्हास्तरावरील नेत्यांमध्ये बैठका पार पडून आगामी जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडीत सकारात्मक निर्णय झाल्याचेही मला सांगण्यात आले. त्यामुळे राज्यस्तरावर घडवून आणलेली महाविकास आघाडी आता आपोआपच तालुका आणि जिल्हा स्तरावर रुजत असल्याचा आनंद वाटतो, असे पवार म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/