गावोगावी ‘कोरोना’ची भीती ! पुण्यात मृत्यू झालेल्या वृद्धाच्या अंत्यविधीस सोलापुरात विरोध

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशभरात कोरोनामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असून गावोगावी अपवांचे पीक जोमात आहे. त्यामुळे नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही नागरिक विरोध करीत असल्याचे दिसून आले आहे. आजारपणामुळे एका वृद्धाचा पुण्यात ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी सांगोला येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास गावकर्‍यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे त्यांचा शेतातच अंत्यविधी उरकावा लागला.

शिरभावी (ता. सांगोला) येथील रघुनाथ येताळा कांबळे (वय 70) यांच्यावर आजारपणामुळे पुण्यात ससून रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. श्वसनविकार व न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले गेले. त्यानंतर मुलगा बबलू कांबळे याने एका महिला नातेवाईकासह भाडोत्री वाहनातून वडिलांचा मृतदेह शिरभावी गावात आणला. कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी, संचारबंदी तथा जिल्हाबंदी असतानाही मृतदेह पुण्याहून कसा आणला, याबद्दल गावकर्‍यांनी आक्षेप घेत गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी उरकण्यास विरोध केला.

अवघ्या गावाने केवळ कोरोना संसर्गाच्या भीतीने मृताच्या कुटुंबीयांवर बहिष्कार घातला. त्यानंतर मृतावर त्याच्या मुलाने आपल्या नातेवाईक महिलेच्या मदतीने शेतात अंत्यसंस्कार केले. अंत्यविधी उरकल्यानंतरही गावकर्‍यांनी मृताच्या मुलाला आणि त्याच्या नातेवाईक महिलेला गावात येण्यास पुन्हा विरोध केला. दरम्यान, ही बाब समजल्यानंतर गावात पोलीस धावून आले. गावकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अखेर मृताच्या मुलासह संबंधित नातेवाईक महिलेची सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.