सांगलीतील मृत्यूदरावरुन फडणवीसांचे राज्य सरकारवर ‘गंभीर’ आरोप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगलीतील मृत्यूदर 4.10 टक्क्यांवर गेला आहे. रुग्णांना खाटा मिळत नाहीत, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी 8-10 रुग्णालयांमध्ये फिरावे लागते. या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारने अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबतही रुग्णांसह रुग्णालयांच्या तक्रारी वाढत असल्याने सरकारचे दुर्लक्ष स्पष्ट होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते सांगलीत कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करा
शुक्रवारी इस्लामपूर येथील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीतील कोरोना परिस्थिचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, सांगलीमध्ये ऑक्सिजनयुक्त खाटांची कमतरता आहे. व्हेंटिलेटर पुरेसे नाहीत. कोव्हिड डेडिकेटेड रुग्णांना वेळेत प्रवेश मिळत नाही. प्रशासन हतबल होत असल्याने सरकारला यामध्ये लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगत त्यांनी सांगलीतील मृत्यूदर कमी करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारी योजनेतून मोफत उपचार मिळत नाहीत
राज्य सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार मिळवणाऱ्या रुग्णालयांची यादी सरकारने जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र रुग्णांना या योजनेतून मोफत उपचार मिळत नाही. सरकारकडून पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णालयांकडून केल्या जात आहेत. रेडमेसिव्हरसारखे महागडे औषध सर्वसामान्यांना कसे परवडणार ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी हे औषध सरकारने उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली. अन्यथा मृत्यूदर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मानसिक आधारासाठी मंदिरे उघडण्याची गरज
राज्य सरकारने राज्यातील दारुची दुकाने सुरु केली, मॉल्स सुरु केले.मात्र धार्मिक स्थळे अद्यापही बंद आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी धार्मिक स्थळे उघडली, मात्र महाराष्ट्राची भूमिका अजब आहे. दारुची दुकाने उघण्यात जेवढा उत्साह दाखवला, त्यापेक्षा किमान अर्धा उत्साह धार्मिक स्थळे उघडण्यासाठी दाखवावा. लोकांना मनसिक आधाराची गरज असल्याचे सांगत त्यांनी सरकारने तातडीने मंदिरे खुली करावीत असे आवाहन केले.