कंगना राणावत भाजपमध्ये प्रवेश करणार का ? देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. इतकंच नाही तर अजूनही हे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. अशात कंगना भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू होती. कंगनानं तर स्पष्ट केलं होतं की, ती कोणत्याही पक्षात जाणर नाही. यानंतर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील कंगनाचा राजकारणात येण्याचा कल नसल्याचा खुलासा केला आहे.

एका वृत्तपत्रासोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कंगनाचा राजकारणात येण्याचा कल नाही. हे प्रकरण सरकारनं वाढवलं आहे. कंगना काही राष्ट्रीय नेत्या नाहीत. यांनीच तसं बनवलं. सरकरानं त्रस्त करणं, प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी हे योग्य आहे का ? आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करत आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची ? दुर्दशा झाली. राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही.”

‘भाजपच काय मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही’ : कंगना
एका सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान भाजप प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना कंगना म्हणाली होती की, “भारतीय जनता पार्टीच काय, मी अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. मी बेधडकपणे बोलत असते. त्यामुळं माझ्या अशा स्वभावामुळं मी राजकारणात टिकू शकत नाही. मी कोणत्याही पक्षात बांधून राहिल्यासारखं काम करू शकत नाही.”