‘सोन्याचा चमचा तोंडात घेवुन जन्मलेलो नाही, आमचा डीएनए संघर्षाचा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ‘राज्यातील सध्याचं सरकार हे जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे अशा तोऱ्यात काही नेते बोलत असतात. पण हे सरकार जनतेने निवडून दिलेले नाही. जनतेनं भाजपा आणि मित्र पक्षांना निवडून दिलं आहे. हे बेईमानीने बनलेले सरकार आहे,” असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाविकास आघाडीवर’ केला आहे. महाराष्ट्र भाजपाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलतं होते.

‘आम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेलो नाही. आम्ही संघर्षांतून पुढे आले आहोत. जमिनीवर राजकारण करणारे लोक आहोत आमचा डीएनए संघर्षाचा आहे, असा अप्रत्यक्ष टोला देखील फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

ठाकरे सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, ‘कोरोना संसर्गाच्या लढ्यात राज्यातील रिक्षा सरकार पुरतं अपयशी ठरलंय. मात्र, याकडे नागरिकांचं लक्ष जाऊ नये म्हणून आमच्यावर सरकार पाडण्याचा आरोप केला जातो. रोज तेच तुणतुणं लावलं जातंय. सरकार पाडून दाखवा असे आव्हान दिलं जातंय. स्वतःच मारायचं आणि स्वतःच रडायचं यातील हा प्रकार आहे. परंतु, आम्हाला सरकार पाडण्यात अजिबात रस नाही. आम्ही ते पाडणार नाही. तुम्ही सरकार चालवून दाखवा,’ असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिलं आहे.

पुढं बोलताना त्यांनी म्हटलं, ‘हे सरकार अनेक अंतर्विरोधकांनी भरलेलं आहे. ते पाडण्याची गरज नाही. हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या तंगड्या तोडण्यास सक्षम आहेत. रोजच्या रोज त्यांचं तेच सुरु आहे. त्यामुळेच त्यांचं सरकार पडेल. मग महाराष्ट्राचं भवितव्य आम्ही ठरवू. सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे जनतेसाठी संघर्ष करत राहू. कोरोना संसर्गाच्या काळात आम्ही सरकारला सहकार्य केलं. पुढेही करु. पण सरकारची दिशा योग्य नसेल. लपवाछपवी होत असेल आणि लोकांवर अन्याय होत असेल तर ते समोर आणण आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही बजावणारच,’ असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे.