देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा, म्हणाले – ‘जाणत्या नेत्याला सगळं माहितीये, पण… !’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षात मतभेद असले तरी केंद्राकडे बोट दाखवण्यात एकमत आहे. जबाबदारीतून हात झटकले जातायेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. तुम्ही राजकीय भाषा कराल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. मला राजकारण करण्याची गरज नाही, शेतकऱ्यांनाही राजकारण नको आहे. असा टोला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणाही साधला आहे.

अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. फडणवीस महणाले, “कोरोनामुळं आर्थिक संकट जसं राज्यावर आहे तसंच केंद्रावरही आहे. कर्ज काढलं पाहिजे ही शरद पवारांची सूचना योग्य आहे, या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवारांवर जबाबदारी आहे. शरद पवारांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. परंतु सरकारचा बचाव करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच ते बोलतात. शेतकऱ्यांकडे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी पोहोचले नाहीत अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या आहेत. इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकतं परंतु केंद्राकडं बोट दाखवून जबाबदारी झटकली जाते” असंही ते म्हणाले.

पुढं बोलताना फडणवीस म्हणाले, “जीएसटीबाबत मार्चपर्यंत सर्व अनुदाने केंद्रानं राज्य सरकारला दिली आहेत. राज्याप्रमाणे केंद्रालाही जीएसटी मिळाला नाही. केंद्र सरकार 1 लाख कोटींची कर्ज घेऊन राज्याला जीएसटी परतावा देणार आहे. तो पैसा राज्याला येणार आहे. परंतु आता राज्य सरकारनं त्वरीत शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. राज्याची कर्ज काढण्याची पत 1 लाख 20 हजार कोटी आहे. सध्या 50 हजार कोटींचं कर्ज राज्यावर आहे. त्यामुळंम आणखी कर्ज काढू शकतो.” असंही त्यांनी सांगितलं.