पुणेकरांचा CM ठाकरेंना सवाल, उद्या फडणवीस येतायत, तुम्ही कधी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पुणेकर कोरोनाच्या संकटामध्ये होरपळून निघाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन महिन्यांनी मंगळवारी (दि.23) पुणे दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी फडणवीस हे महिन्यातून किमान दोनवेळा पुण्यात येत होते. फडणवीस पुण्यात येत असले तरी कोरोनाचा फटका बसलेल्या पुण्याला मुख्यमंत्री कधी भेट देणार असा प्रश्न आता पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर बारीक लक्ष होते. पुण्यातील सर्व माहिती समजली पाहिजे असा त्यांचा अग्रह असायचा. त्यामुळे पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावत होते. परंतु पुण्यात 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर ही संख्या अधिकच वाढत गेली. या कालावधीत भाजपचे जबाबदार नेते, माजी मुख्यमंत्री म्हणून ते एकदाही पुण्यात आले नाहीत. तसेच राज्यात मुंबई खालोखाल पुण्यात रुग्णांची संख्या का वाढत आहे, याची त्यांनी एकदाही चौकशी केली नाही.

लॉकडाऊन काळात मंत्र्यांचे दौरे रद्द करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पुण्याचा दौरा केला नाही. त्यांनी चक्रिवादळाचा फटका बसलेल्या भागाला भेट दिली पण पुण्याला भेट दिली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आढावा बैठका घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी वादळाचा फटका बसलेल्या भागाचा दौरा वगळता महाराष्ट्रात इतर कोणत्याही भागाचा दौरा केला नाही. आता देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यानंतर मात्र, इतर नेत्यांच्या पुणे दौऱ्याकडे लक्ष लागणार आहे.

फडणवीसांचा पुणे दौरा
फडणवीस हे मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट देतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता महापालिकेच्या नायडू रुग्णालयात येतील. दुपारी सव्वा तीन वाजता विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांची भेट घेणार आहेत. सायंकाळी सहा वाजता आपटे रस्त्यावर एका हॉटलमधील कार्याक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. ते पुण्यात मुक्कम करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या शासकीय दौऱ्यात याबाबत काही उल्लेख करण्यात आलेला नाही.