‘शिवसेनेनं कोकणवासीयांच्या भावना दुखवल्यात, मोजावीच लागेल किंमत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणात कोरोनाचा संसर्गाचा प्रसार वाढत आहे. गरज असेल तरच गणपतीसाठी कोकणात या, बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन रहावे लागेल, असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘गणेशोत्सवाच्या बाबत शिवसेनेनं दुट्टपीपणाची भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल’ असा इशारा दिला आहे.

मुंबई, पुणे तसेच राज्यात ठिकठिकाणी राहत असलेल्या चाकरमान्यांची गणेशोत्सवाकरिता कोकणात पोहचण्यासाठी धावाधाव सुरु आहे. पण कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन असल्याने त्यांच्या प्रवासात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने ई-पास. क्वारंटाईन संदर्भात अद्यापही कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने चाकरमानी संभ्रमात आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना एसटीची सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे म्हटलं होतं. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. त्यातच कोकणातील गावागावांमध्ये बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठी वेगवेगळे नियम बनवले आहेत. त्यांना प्रवेश देण्यावरुन गोंधळ सुरु आहे.

अशातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, कोकणात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. म्हणून गरज असेल तरच गणपतीसाठी कोकणात या. बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन रहावेच लागेल, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की, ‘विनायक राऊत यांचे वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचं आहे. एका बाजूला भावना आणि दुसरीकडे वास्तव आहे. ज्या कोकणी नागरिकांच्या भावनेवर स्वार होऊन शिवसेनेनं राजकीय यश संपादन केलं. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढवली, त्याचं चाकरमान्यांच्या भावनेला आता शिवसेना पायदळी तुडवत आहे. शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागेल,’ असा इशारा दरेकरांनी दिला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like