प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप, म्हणाले – ‘नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गित रुग्णांच्या जास्त संपर्कात असलेल्या सर्वांची चाचणी करण्यात येते. मात्र, नवी मुंबईत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा फुगवण्यासाठी चाचणी करायला आलेल्या रुग्णांच्या आकड्यासोबत रुग्णांच्या नातेवाईकांचे बनावट कोरोना चाचणी अहवाल बनवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यात संतापजनक गोष्टी अशी की, दहा वर्षांपूर्वी ज्या इसमाचा मृत्यू झाला होता, त्या व्यक्तीचाही कोरोना अहवाल सकारात्मक असल्याचे समोर आले आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला असून, या प्रकरणाची दखल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वतः घेतली आहे. यासंदर्भात दरेकर म्हणाले, कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे मी आणि देवेंद्र फडणवीस सांगत होतो. फॅन घेणे, बेड घेणे यात घोटाळा झाल्याचे आम्ही राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच पत्रव्यवहारही करण्यात आला होता. पण त्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. आज जे उघडकीस आले आहे, त्याने कोरोनाचे एक भयाण वास्तव आपल्यासमोर आणले आहे.

तसेच एक यादी दाखवत त्यांनी म्हटलं की, ज्या व्यक्ती गावाला गेल्या असताना त्यांच्या नावासमोर ‘कोरोना निगेटिव्ह’ असा शेरा मारण्यात आला आहे. त्याचसोबत मृत व्यक्तीच्याही चाचण्या झाल्याचे त्यांनी सांगितलं. काही ठिकाणी एका व्यक्तीची चाचणी करण्यात आल्यानंतर घरातील सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह दाखवण्यात आले. अशा पाच हजार नागरिकांची यादी आपल्याकडे असल्याचे दरेकर म्हणाले.

अशा प्रकारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा वाढवायचा. आकडा वाढल्याने या सर्व यंत्रणेवर करण्यात येत असलेला खर्च होतो, तो न करता केवळ आकडा दाखवून मोठा भ्रष्टाचार करायचा, असेही दरेकर यांनी सांगितलं. या प्रकरणी दरेकर लवकरच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेणार असून, या घोटाळ्याच्या चौकशीची मागणीही करणार आहेत.