दलित-मुस्लीम समाजात विष कालवण्याचे काम विरोधक करत आहेत : नितीन गडकरी

पैठण : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपबद्दल दलित-मुस्लीम समाजात संभ्रम निर्माण करून विष कालवण्याचे काम विरोधक करत आहेत. विरोधकांचा हा डाव मतदारांनी हाणून पाडावा. आम्ही राबविलेली कोणतीही योजना अमूक एका जाती समूहासाठी नसून, ती सर्वांसाठी आहे. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्यातील मतदान झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान राहिलेल्या मतदार संघांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान, जालन्याचे युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ पैठण येथील खरेदी विक्री संघाच्या मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू ते राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी गरिबी हटावचा नारा दिला, पण काँग्रेसच्या काळात सर्वसामान्य माणसांची नव्हे तर कॉंग्रेसचे नेते -कार्यकर्ते यांचीच गरिबी हटली. आज ही नेहरूंचे पणतू गरीबी हटाव ची घोषणा देऊन मतदान मागत आहेत, देशात ६५ वर्षे सत्ता उपभोगुनही त्यांना गरीबी हटवता आली नाही ही मोठी शोकांतिका आहे. असे नितीन गडकरी यांनी म्हंटले .

याचबरोबर, आम्ही राबविलेली कोणतीही योजना अमूक एका जाती समूहासाठी नसून, ती सर्वांसाठी आहे. नेमकी हीच बाब विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच भाजपबद्दल दलित-मुस्लीम समाजात संभ्रम निर्माण करून विष कालवण्याचे काम विरोधक करत आहेत. विरोधकांचा हा डाव मतदारांनी हाणून पाडावा. असे आवाहनही त्यांनी केले. .