‘विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं’, रोहित पवारांचा फडणवीसांना शाब्दिक चिमटा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने महाराष्ट्राकडे मोठा हॉटस्पॉट म्हणून पाहिले जात आहे. याच दरम्यान राज्य सरकार करत असलेल्या कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने देखील मुंबईत सुरु असलेल्या कामाची दखल घेऊन कौतुक केले. परंतु विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईमध्ये कोरोनाचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र ट्विटरवर शेअर केले. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे.

रोहित पवार यांनी दोन ट्विट केले आहेत. या ट्विटमधून देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर पलटवार केला आहे. रोहित पवार म्हणाले, कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच कोविडचा हा लढा संपलेला नाही, त्यामुळे राजकीय टीका-टीप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.

एखादं पत्र केंद्राला जरुर लिहावं
कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळे राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं, असा सल्ला रोहित पवार यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे अभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे, असा आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधत राज्यातील कोरोना स्थितीची माहिती घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, अशा शब्दांत मोदी यांनी राज्याच्या यंत्रणेचे कौतुक केले. यावेळी राज्याला पुरेसा लस पुरवठा करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.