उस्मानाबाद : पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

उस्मानाबाद ; पोलीसनामा ऑनलाईन – पारदर्शीपणे नोकरभरती प्रक्रियेच्या नावाखाली राज्य सरकारने सुरू केलेल्या महापोर्टलच्या माध्यमातून मोठा आर्थिक घोळ होत आहे. ‘एमपीएससी’द्वारे नोकरभरती करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातील तरूण महापोर्टलच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍या हजारो युवक-युवतींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत महापोर्टल बंद करण्याची मागणी केली. तसेच सरकारने महाभरतीचे आश्वासन न विसरता तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणीही युवक-युवतींनी केली आहे.

राज्यात महापरिक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणार्‍या विविध विभागांच्या परीक्षांमध्ये आर्थिक व्यवहार व गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. वनरक्षक पदाच्या परिक्षेत शारीरिक चाचणी परिक्षेस गैरहजर राहणारे विद्यार्थी राज्यात प्रथम आले. तसेच वनरक्षक लेखी परिक्षेतही मोठे घोळ झाले आहेत. तलाठी परिक्षेत प्रत्येक शिफ्टच्या पेपरमध्ये पाचपेक्षा अधिक प्रश्न रद्द केले गेले, तरीही काही विद्यार्थ्यांना 194 पेक्षा अधिक गुण मिळाले. महापरिक्षा पोर्टल विद्यार्थ्यांना रिस्पान्सशीट पाठवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणता पर्याय निवडला, किती प्रश्न बरोबर आले व किती प्रश्न चुकले हे कळत नाही.

महापोर्टलमार्फत दिवसेंदिवस होणारे घोटाळे लक्षात घेवून व स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या मुला-मुलींच्या मनातील रोष पाहून सरकारने आगामी काळात सरळसेवा भरती जिल्हा निवड समितीमार्फत ऑफलाईन पध्दतीने एकाच दिवशी घ्यावी. तसेच पोलीस भरतीची लेखी परिक्षा देखील महापोर्टलमार्फत न घेता त्या-त्या जिल्ह्याच्या पोलीस घटकामार्फत एकाच दिवशी ऑफलाईन पध्दतीने घेण्यात यावी. महापरिक्षा पोर्टल कायमस्वरूपी बंद करून राज्यातील गोरगरीब व अभ्यासू युवक-युवतींवरील अन्याय टाळावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी हजारोंचा जमाव होता.