CAA – NRC च्या विरोधात आंदोलन करणार्‍यांपासून विरोधी पक्षानं दूरच रहावं, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा २०२० च्या निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरीनंतर कॉंग्रेसमध्ये चालू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ‘नेत्यांचा अहंकार आणि महत्वाकांक्षांचा नायनाट सोबतच होणे’ ही काळाची मागणी आहे. राज्यसभेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री म्हणाले की, पक्षाने ‘बोगद्याच्या शेवटाला प्रकाश पाहण्याऐवजी’ अजून पुढे जाणे आवश्यक आहे. आणि कॉंग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी तरुण नेत्यांच्या रस्त्यात काटे न टाकता त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

एनआरसी – सीएए – एनपीआर च्या विरोधात देशव्यापी आंदोलनाच्या मुद्द्यावर जयराम रमेश म्हणाले की, राजकीय (विरोधी) पक्षांनी या निदर्शनांपासून एक ‘हात’ लांबच राहिले पाहिजे आणि जनआंदोलनांना जबरदस्तीने स्वत:चे बनवण्याचा प्रयत्न देखील करणे चुकीचे आहे.

ते म्हणाले, ‘आम्ही सर्वजण या दिशेने कार्य करीत आहोत. कुण्या एकाच्या हातात जादू नसते. हा सामूहिक प्रयत्न आहे. हे सामूहिक काम, सामूहिक शिस्त आणि प्रत्येक व्यक्तीचा अहंकार समाप्त करण्याचे आव्हान असेल.’ देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबद्दल विचारले असता, जयराम रमेश म्हणाले, ‘आपल्या सर्वांची आपली-आपली स्वतंत्र महत्त्वाकांक्षा आहे, परंतु आता फक्त एकच महत्वकांक्षा असली पाहिजे, ती म्हणजे पक्षाला पुन्हा उभे करणे, समर्थकांना एकवटून ठेवणे आणि सत्तेवर पुन्हा येणे.

आपल्याला खूप मोठा प्रवास करावा लागणार आहे – जयराम रमेश
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसर्‍या वेळी एकही जागा न मिळाल्याने कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आणि नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले. जयराम रमेश यांनी अशी सूचना केली की कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या नेत्यांना मार्गदर्शन करावे. ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत आम्ही केवळ केंद्रातच नव्हे तर राज्यातही सत्ता गमावली. तथापि, काही ठिकाणी आम्ही परत आलो. आपल्याला पुढे जाण्यासाठी अजून खूप मोठा प्रवास करावा लागणार आहे… अर्थात बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहे पण बोगदा खूप लांब आहे… तो प्रकाश पाहण्यासाठी आपल्याला अजून खूप पुढे जावं लागेल.’

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर) च्या विरोधात होत असलेल्या निषेधाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, या विषयाचे राजकारण केले जाऊ नये.

जन आंदोलनापासून एका हाताचे अंतर ठेवावे
कॉंग्रेस नेते म्हणाले, ‘या जनआंदोलनांपासून आपण एक हात लांबच राहिले पाहिजे. आपण त्याचे राजकारण करण्याचा किंवा जन आंदोलनाला राजकारणाचा मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू नये. काही गोष्टी राजकीय पक्ष करू शकत नाहीत किंवा करूही नये. ते म्हणाले, ‘हे निषेध उत्स्फूर्त होऊ द्यायला हवेत कारण ते भाजप सरकारविरूद्ध जनतेचा रोष दर्शवतात.’

माजी केंद्रीय मंत्री म्हणाले की, ज्या राज्यात कॉंग्रेसची सत्ता आहे तेथे सरकारचा सीएए – एनआरसी – एनपीआरविरोधात प्रस्ताव आला. ते म्हणाले, ‘जे काही घटनात्मक आणि लोकशाही पद्धतीनं आहे ते केले जाते. आम्ही राजकीय पक्ष म्हणून संसदेवर या विरोधात लढा दिला परंतु आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे आम्ही पराभूत झालो. तसेच आम्ही कोर्टातही गेलो.’