केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना आनंदाची बातमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांना रेशनवर धान्य मिळत नाही. मात्र आता प्राधान्य गटात नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाला आनंदाची बातमी आहे. पुणे शहरातील १ लाख ८० हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशनवर धान्य मिळणार आहे.

केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशनवर धान्य देण्याचा निर्णय अन्नधान्य पुरवठा विभागाने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून ४५ हजार शिधापत्रिकाधारकांची नावे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. यामध्ये वाढ करत आणखी ५५ हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाने शहरातील बोगस शिधापत्रिकाधारकांचा शोध घेण्यासाठी एक मोहीम राबवली होती.

प्राधान्य गटात असूनही सलग तीन महिने धान्य न घेणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांचा शोध घेतला. ज्यांनी सलग तीन महिने धान्य घेतले नाही अशा शिधापत्रिकाधारकांची नावे या योजनेतून वगळ्यात आली आहेत. ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांचे शिल्लक राहिलेले धान्य नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ कसा घ्याल

अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी जुन्या केशरी शिधापत्रिका आणि वार्षिक उत्पन्न ५९ हजार असणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करावा लागणार असून हे अर्ज पुरवठा विभागाच्या कार्यालयात मोफत देण्यात येणार आहेत. तसेच यासाठी कोणताही खर्च येणार नाही. फक्त अर्जासोबत उत्पन्नाचे घोषणापत्र साध्या कागदावर लिहून देयचे आहे. या अर्जासोबत तुमच्याकडे असलेल्या जुन्या केशरी शिधापत्रिकेची झेरॉक्स आणि कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डाची झेरॉक्स प्रत जोडावी लागणार आहे.