महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ अशी ख्याती असलेले अभिनेते, होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विद्यमान अध्यक्ष आदेश बांदेकर आहेत.

अभिनेते आदेश बांदेकर हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रीय झाले आहेत. सध्या बांदेकर यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे.

अभिनय क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केलेल्या आदेश बांदेकरांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेतही त्यांना वेळोवेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यास देण्यात आल्या.

दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.