… तर पलटवार करा, भाजपा कार्यकर्त्यांना आक्रमक उत्तर देण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजप – शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर राज्यात विरोधी पक्षातील आणि सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर अनेकदा वादविवाद रंगल्याचे पहायला मिळत आहेत. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या बाजूने समोरच्याला प्रत्युत्तर देत आहेत. आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचं भान राखत आक्रमक पद्धतीने काम करावं, टीकेला जशास तसे उत्तर द्यावे असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत.

भाजपच्या प्रदेश पदाधिकारी बैठकीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, कोरोनामध्ये लोकांना मदत करुन राज्य सरकारविरोधात आगामी काळात विविध मुद्यांवर पक्षाला आंदोलन करावं लागेल, कोरोनाच्या लढाईत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकांनी मदत करावी, लोकांच्या अडीअडचणीला धावून जा, सामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार असल्याचे त्यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले.

टीकेवर पलटवार केला पाहिजे
सत्ताधाऱ्यांनी मृतदेहाच्या बॉडी बॅगचा भ्रष्टाचार सुरु केला, मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं आहे. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात केलेला भ्रष्टाचार उघड करावा लागेल. खूप मोठी राजकीय लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. कोणी टरपुजा, चंपा म्हणालं तर त्याच्यावर पटलवार केला पाहिजे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

आक्रमक पद्धतीने उत्तर द्या
बैठकीदरम्यान पाटील यांनी प्रचंड आक्रमक पद्धतीने विरोधी कार्यकर्त्यांना उत्तर द्या, शांत बसणं म्हणजे मान्य केल्यासारखे होते. आक्रमक उत्तर देताना शब्द जपून वापरावेत, जेणेकरून ते मागे घ्यावे लागणार नाहीत. शब्दांची धार वापरा, कोरोनाच्या परिस्थितीचं भान ठेवत आक्रमक राहिलं पाहिजे, असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

स्वबळावर लढण्यासाठी तयार रहा
येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार रहावे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी सांगितले. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र अद्याप चार वर्षे आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूने प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल, केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्रही येऊ असं त्यांनी सांगितले.