PUNE : नागरिकांना लुटणाऱ्या तलाठ्यांवर कारवाईचे विभागीय आयुक्तांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तहसील आणि तलाठी कार्यालयात नागरिकांच्या सर्रासपणे सुरू असलेल्या लुटीविषयी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी गंभीर दखल घेतली असून पथके नेमून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिला आहे.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली तहसीलदार कार्यालय आणि तलाठी कार्यालयासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, उद्या सायंकाळपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

सेवा हमी कायदा धाब्यावर बसवून हवेली तहसील आणि तलाठी कार्यालयात नागरिकांच्या सर्रासपणे सुरू असलेल्या लुटीच्या घटना घडत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयातदेखील हवेली तहसील आणि तलाठी कार्यालयातील कारभाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी तलाठ्यांचे दफ्तर तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

आता आयुक्तांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी तक्रारींचे निवारण करण्यासाठी तातडीने चौकशी पथके नेमावीत. चौकशी करून उद्या सायंकाळपर्यंत अहवाल अहवाल सादर करावा. जे दोषी असतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच केलेल्या कारवाईची माहितीदेखील कळवावी असे आदेश दिले आहेत.

Visit : Policenama.com