हवेची गुणवत्ता ‘खराब’ असलेल्या राज्यांत 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी : NGT चा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवाळीच्या (Diwali) दिवसांत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची मागणी असते. खास करून लहान मुलांमध्ये फटाक्यांची जास्त क्रेझ असते; परंतु कोरोना व्हायरस ( Corona Virus) आणि दिल्लीतील ( Delhi) खराब हवा आणि प्रदूषणामुळे (Pollution) दिल्लीतील नागरिकांना या दिवाळीत फटाके फोडता येणार नाहीत. यासंदर्भात नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) (NGT) मोठा निर्णय घेतला आहे. एनसीआरमध्ये वाढत्या हवा प्रदूषणाचा विचार करता एनजीटीने सोमवारी आदेश देताना दिल्ली-एनसीआरमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर इतर राज्यांमध्येदेखील ज्या ठिकाणी हवा खराब आहे तिथे फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

या भागामध्ये हवा प्रदूषणाची पातळी अधिक असलेल्या ठिकाणी 9 ते 30 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि वापरावर बंदी असेल. मात्र, जेथे एअर क्वाॅलिटी योग्य अथवा मॉडरेट आहे, तेथे फटाके उडवले जाऊ शकतात. असे एनजीटीने म्हटले आहे. यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात एनजीटीने म्हटले आहे, की 9 ते 30 नोव्हेंबरदरम्यान एनसीआरमध्ये फटाके विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी असेल. 30 नोव्हेंबरनंतर यासंदर्भात समीक्षा केली जाईल. यानुसार, जेथे मागील वर्षाच्या आकडेवारीच्या तुलनेत या नोव्हेंबर महिन्यात सरासरी एक्यूआय खराब अथवा धोकादायक पातळीवर असेल, अशा सर्वच शहरांत फटाक्यांवर बंदी असेल. त्याचबरोबर या आदेशात हरित लवादाने म्हटले की, ज्या भागात हवेची पातळी योग्य आहे, त्या ठिकाणी फटाके विक्रीला परवानगी आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी फकाटे केवळ दोन तासच उडवता येतील.

याशिवाय इतर दिवशी फटाके उडवता येणार नाहीत. दिल्ली सरकारने कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. पण हरित लवादाने ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या राज्यांनी अद्याप फटाक्यांवर बंदी घालण्याचा कसल्याही प्रकारचा आदेश दिलेला नव्हता.दरम्यान, कोरोना व्हायरस आणि प्रदूषणच्या पार्श्वभूमीवर केवळ दिल्लीतच नव्हे तर राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिसा, सिक्कीममध्येदेखील फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आलेली नाही.