‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीचा नांगरे पाटील यांचा आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती येथे पोलीस ठाण्यात सीआरपीएफच्या जवानाला झालेल्या मारहाणी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत. ही चौकशी बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या शोकसभेसाठी परवानागी मागण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफ जवानास बारामती तालुका पोलीस ठाण्यात बंद खोलीत बेड्या ठोकून अमानूष मारहाण करण्यात आली होती. अशोक इंगवले असे या जवानाचे नाव असून या मारहाणीत इंगवले यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत.

महिनाभराच्या सुटीवर आलेले अशोक इंगवले हे सोनगाव (ता. बारामती) येथील रहिवाशी आहेत. शिवजयंती निमित्त गावामध्ये पाच दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेसाठी बारामती तालुका पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यासाठी सीआरपीएफ ११८ बटालियनचे जवान  अशोक इंगवले त्यांच्या बंधू माजी सैनिक किशोर इंगवले यांच्यासह तालुका पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सोबत दुचाकीवर एक अल्पवयीन मुलगा होता.

तुम्ही ह्यट्रीपल सीट का आला म्हणून सुरूवातीला पोलिस ठाण्याच्या आवारातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वर्दीवर असणाऱ्या अशोक इंगवले यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावर इंगवले यांनी साहेब मी, कोणत्या कारणासाठी आलो आहे, ते तरी पहा अशी विनंती केली. मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही नसलेल्या बंद खोलीत नेऊन अशोक इंगवले यांना बेड्या घातल्या व सुमारे पंधरा ते सोळा कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली, असा आरोप इंगवले यांनी केला आहे. ही मारहाण इतकी गंभीर होती की, अशोक इंगवले यांच्या उजव्या हाताला जबर जखम झाली. तर अंगावर वळ देखील उठले आहेत. पोलिस मारहाण करीत असताना जीवाच्या आकांताने जवान ओरडत असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शी सांगितले.