सर्वच राजकीय पक्षांकडून माळी समाजाचे शोषण

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य निर्मितीपासून सर्वच राजकीय पक्षांकडून माळी समाजाचे राजकीयदृष्ट्या अविरत शोषण केल्या गेले आहे. आजपर्यंत समाजाला प्रत्येक पक्षाने वापरून घेतले. त्या बदल्यात समाजाला योग्य प्रतिनिधित्व न दिल्यामुळे यावेळी समाजाने आपली वज्रमुठ बांधण्याचे निश्चित केले. ज्यांनी ज्यांनी राजकीय शोषण केले, अशांना जागा दाखविण्यासाठी येत्या २८ डिसेंबरला शेगाव येथे वंचित माळी समाज एल्गार परिषदेचे आयोजन केले आहे.

राज्यभरात माळी समाज हा लोकसंख्येने क्रमांक दोन वर आहे. मात्र राजकीय क्षेत्रात आमदार-खासदार व इतरही ठिकाणी समाजाला प्रतिनिधित्व न देण्याचे षडयंत्र वापरले गेले. समाजात असलेले लहान-मोठे नेतृत्व सर्वच राजकीय पक्षांनी फुल दिले नाही. त्यांचा विशिष्ट पातळीपर्यंत वापर करून ते नष्ट करण्याचे काम केल्या गेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात समाजातील विविध पक्षातील केवळ ११ आमदार व एक खासदार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी पद्धतशीरपणे या समाजाचा आपल्या उत्कर्षासाठी वापर केला असून, त्या बदल्यात त्यांना काहीही दिले नाही. परंतु नवीन पिढी ही या षडयंत्राला बळी न पडता सक्षमपणे उभी राहत असून यावर राजकीय आसूड ओढण्याच्या तयारीत आहे.

आजपर्यंत माळी समाज विविध पक्षांना मते देऊन त्यांना विजय रथावर बसवित होते. परंतु आता सत्तेचा उन्माद चढलेल्या या राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखविण्यासाठी संपूर्ण माळी समाज जागा झाला आहे. २८ डिसेंबरला शेगाव येथे वंचित माळी समाज एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.