Mumbai News : काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल, प्रभारी साधणार संवाद

मुंबई (Mumbai News)  : काँग्रेसची झालेली वाताहत पाहता संघटनात्मक बदलाची चर्चा जोर धरू लागली होती. त्यानंतर झालेल्या हैद्राबाद, बिहार निवडणुकीतही झालेल्या पराभवामुळे तर अनेक राज्यातील संघटनात्मक बदलाचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार काही राज्यात बदलही केले गेले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातही बदलाचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील हे मंगळवारी रात्री मुंबईत (Mumbai News) पोहोचले असून पुढील दोन दिवस ते काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि मंत्री, आमदारांशी पक्षसंघटना मजबूत करण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असावा, या संदर्भात काही निवडक नेत्यांची मतेही ते जाणून घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काही दिवसांपासून नवीन प्रदेशाध्यक्ष देण्याचे संकेत मिळत होते. मात्र त्याच्यावर काहीही कार्यवाही झाली नाही, मात्र, काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी बदलाचे संकेत दिले होते. त्यातच सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दिल्लीला गेले होते त्यांनी प्रदेशाध्यक्षपद नको म्हणून सांगितल्याचे बोलले जाते. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण चेहऱ्याचा शोध घेत आहेत. नवीन प्रदेशाध्यक्ष देण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या मुंबई भेटीला महत्त्व आले आहे. दिल्लीला गेलेले थोरात मुंबईत परतले असून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले, ही बातमी आली कुठून? माझ्या राजीनाम्याची बातमी चुकीची आहे. तशी कुठलीही चर्चा नाही. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश आला तर पद सोडण्याची आपली तयारी आहे. तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. मी राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी पत्रकारांना सांगितले की आगामी महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील पूर्वतयारी, रणनीती निश्चित करण्यासाठीच्या बैठकांसाठी पाटील यांचा हा दौरा आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा विषय त्यात नसेल.

कोणाची वर्णी लागणार?
प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या तरुण दमाच्या चेहऱ्याची आवश्यकता आहे. तसा विचार झाल्यास नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून खा. राजीव सातव, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोेले, मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार आदी नावे चर्चेत आहेत. महसूल मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अशी तीन पदे थोरात यांच्याकडे आहेत.