‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेच्या बहाण्याने महिलांना गंडा, स्पर्धा घेणारे ग्रॅंड फिनालेआधी पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइ – ‘इंडियाज सुपर मॉम’ स्पर्धेसाठी गेल्या २ दिवसांपासून पुण्यात आलेल्या ४४ महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी सायंकाळी घेण्यात येणाऱ्या अंतिम फेरी होण्याआधीच आयोजक, त्यांचे कर्मचारी फरार झाले आहेत. दरम्यान या फसवणूक झालेल्या स्पर्धकांनी लोणीकंद पोलिसांशी संपर्क साधला. परंतु जेथे सुरुवात झाली तेथेच जाऊन तक्रार करा असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या स्पर्धेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, तुहिन दास आणि तनुश्री दास अशी फसवणुक करणाऱ्यांची नाव आहेत.

– देशभरातील मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा

याबाबत स्पर्धक व त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलेली माहिती अशी, ‘इंडियाज फर्स्ट सुपर मॉम’ या नावाने सौदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी एक ते दीड वर्षांची मुले असलेल्या महिलांची पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा, बंगलोर, अहमदाबाद येथे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचे व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करून जोरदार जाहिरात करण्यात आली. त्यावेळी महिलांकडून प्रत्येकी २० हजार रुपये घेण्यात आले. त्यातून देशभरातील ४५ महिलांची निवड करण्यात आली. २१ जुलै रोजी त्यांची अंतिम फेरी पुण्यात रविवारी हडपसर येथील लॉन्समध्ये घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

– अंतिम फेरीसाठी ४९९ ते १० हजार रुपयांपर्यंतची तिकिटे

या अंतिम फेरीसाठी नामवंत कंपन्यांची स्पॉन्सरशीप मिळविली असल्याचे फेसबुक पोस्ट करण्यात आल्या. त्यासोबतच या सोहळ्यातील परफॉर्मन्स लाईव्ह दाखविले जाणार असून यासाठी कृणाल कपूर, सुधाचंद्रन, रुसलान मुमताज व इतर अनेक नामवंत ज्युरी असतील अशी जाहिरात करण्यात आली. तर कार्यक्रमांसाठी ४९९ ते १० हजार रुपयांपर्यंतची तिकीटे ठेवण्यात आली होती.

महिलांची नामांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था

देशभरातून आलेल्या ४४ महिलांची वाघोलीजवळ असलेल्या एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या महिला आणि त्यांचे पती तेथे आले. हॉटेलची बुकींग ऑनलाईन करावी लागत असल्याने त्यांनी त्यांचे पैसेही भरले.

महिलांकडून २०, ३०, ५० हजार रुपये उकळले

या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांकडून २० हजार, ३० हजार, ५० हजार रुपये स्पर्धेच्या वेळी घेण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. या स्पर्धेत महिलांनी सहभाग घेतल्यानंतर ग्रॅंड फिनालेला लागणारा कपड्यांचा खर्च महिलांनी केला आहे. त्यात महिलांना ५० हजार रुपयांचा खर्च आला आहे.

ग्रॅंड फिनालेसाठी आले, मात्र लॉन रिकामाच

हे सर्व स्पर्धक व त्यांचे नातेवाईक ग्रँड फिनालेसाठी हडपसर येथे लॉन्सवर आले. तेव्हा गेले. तेव्हा तेथील सुरक्षारक्षकांनी येथील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगितले. पुण्यात तुहीन दास आणि त्याच्या साथीदार महिलेसाठी एक तरुण आणि त्याची बहिण काम करत होते. गेल्या दीड महिन्यांपासून या दोघांसाठी काम केले. त्यावेळी त्याच्याकडूनही साडेचार लाख रुपये घेतले. शो संपल्यानंतर आपल्याकडे खुप पैसे येतील असे अमिष दाखवून त्यावर २० टक्के व्याजाचेही अमिष त्याला दाखवले.

फेसबुक पोस्ट, जाहिराती गायब

काल दुपारपासूनच दोघेही गायब झाले आहेत. त्यांचे सर्व मोबाईल बंद आहेत. त्यांनी फेसबुक व इतर ठिकाणी टाकलेल्या सर्व पोस्ट डिलिट करुन टाकल्या आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवडमधील स्पर्धक महिलांच्या नातेवाईकांनी आम्ही उद्या पुण्यातील सायबर पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार करणार असल्याचे सांगितले.

तर लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये हे स्पर्धक उतरले. त्यानंतर संयोजकांपैकी एकाची गाडी अडविली. तक्रार देण्यासाठी काही जण आले होते. मात्र ही घटना ज्या ठिकाणी सुरु झाली तेथील पोलिसांशी संपर्क करुन तक्रार देण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. अशी माहीती लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हाके यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –