महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात पुण्यात येत्या ११ जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीचे इंडिया पोलस फाउंडेशन, ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सेंटर फॉर पोलिस रिसर्च पुणे आणि पुणे पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

यशदा येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे पोलिस महासंचालक डॉ. ए. पी. माहेश्वरी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. यावेळी आमदार डॉ. निलम गोऱ्हे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पोलिस महासंचालक राजेंद्र कुमार, इंडियन पोलिस फाउंडेशनचे अध्यक्ष एन. रामचंद्रन उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये पाच विषयावर चर्चासत्र होणार आहे. यामध्ये नोकरी, सार्वजनिक ठिकाणी महिलांची होणारी सतवणूक, बालकांवरील लैंगिक अत्याचार व पोक्सो कायद्याची अंमलबजावणी, संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून महिला व बालकांचे शोषण, महिला व बालकांचा देह व्यापारतील वापर आणि महिला व बालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना हे विषय राहणार आहेत. या परिषदेला सर्वांना प्रवेस राहणार आहे,अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी दिली.