जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने एड्सबाधित मुलांसाठी ऊर्जापूर्ण योग कार्यशाळेचे आयोजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘जागतिक एड्स दिना’च्या (१ डिसेंबर) निमित्ताने कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्राच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ममता फाऊंडेशन या संस्थेतील एड्सबाधित मुला-मुलींसाठीसाठी एका मनोरंजनात्मक तसेच उर्जापूर्ण योग कार्यशाळेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.

संस्थेतील सात ते अठरा या वयोगटातील मुलं-मुली, तसेच सर्व कर्मचारी यात सहभागी झाले होते. कैवल्यधामच्या या योग कार्यशाळेला या एड्सबाधित मुलांनी अत्यंत सकारात्मक व उत्साही प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यशाळेत भाग घेत त्यांनी आनंदाने विविध योगासनांची माहिती करून घेतली. ही सर्व योगासने व प्राणायमाचे विविध प्रकार निसर्गाशी संबंधित असेच होते. आपल्या दैनंदिन जगण्यात एक सकारात्मकता आणणे व तणावमुक्त वातावरणाची निर्मिती करून आनंदाने जगणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

पुणेस्थित ‘ममता फाऊंडेशन’ ही संस्था एचआयव्हीबाधित मुले व महिलांसाठी एक सेवाभावी प्रकल्प चालवते. या मुलांच्या व महिलांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम व प्रकल्प येथे राबवले जातात.

‘कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्रा’ची स्थापना स्वामी कुवलयानंद यांनी १९२४ मध्ये लोणावळा येथील निसर्गरम्य वातावरणात केली होती. या केंद्रात आध्यात्मिक, उपचारात्मक आणि संशोधनात्मक केंद्रे असून प्राचीन योग ज्ञान व आधुनिक विज्ञान यांचा मेळ घालून मानवी जीवन सुकर करण्यावर येथे भर देण्यात येतो.

Visit : policenama.com