“भारत कधीही अणुबॉम्बचा वापर आधी करणार नाही”

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध रोष आहे. त्यावरून अनेक तर्कवितर्क समोर येत असतात. त्यात भारत पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकेल असं पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी म्हटलं होते. त्यावर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपले मत मांडले आहे. राकेश सूद लिखित ‘न्यूक्लियर ऑर्डर इन दि ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारत अणुकराराचे नियम पाळणारा देश आहे. त्यामुळे भारताकडून कधीही अगोदर अणुशस्त्रांचा वापर केला जाणार नाही. भारत अणुशस्त्रांच्या बाबतीत ‘अनिच्छुक’ देशांच्या पंक्तीत आहे, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं. अणवस्त्रे वापरण्याच्या पूर्वीच्या करारांना इतिहासजमा करण्यासाठी काहींच्याकडून दबाव टाकला जात आहे. त्यामुळे जागतिक तणाव वाढत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

गेल्या ७० वर्षांच्या कालावधीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक देश अणवस्त्र संपन्न राष्ट्रे बनली आहेत. त्यासोबत त्यांचा वापर करणे सोपे होऊन बसले आहे. यामुळे जगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. मात्र, भारत अणवस्त्र कराराचा अवलंब करणारा देश आहे. भारताकडून कधीही अगोदर अणुशस्त्रांचा वापर केला जाणार नाही.

दरम्यान, जगातील अनेक लोकांना भीती आहे की, पूर्वीच्या अणुकरारांचे पालन होते की नाही. अतिसंवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्यास काही राष्ट्रांना धीर धरवणार नाही. मग ते अणुशस्त्रांचा वापर करायला लागतील. त्यामुळे १९४५ मध्ये न पाहिलेली स्थिती उद्भवण्याचा धोका जगाला आहे, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.