कोल्हापुरात ७१ लाखांचे दागिने – हिरे जप्त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कडक नाकाबंदी सुरू आहे. सरनोबतवाडी टोल नाक्यावर स्थिर निरीक्षण पथकाने नाकाबंदी दरम्यान एका चारचाकी वाहनातून ७१ लाखाचे सोने आणि हिरे पकडले आहेत. याप्रकरणी पोलीस आणि प्राप्तिकर विभाग चौकशी करत आहेत.

आचारसंहिता लागू झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात ४८ स्थिर निरीक्षण पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पैसा, दारू, साहित्य वाटप करण्यासंदर्भात नाकाबंदी केली जात आहे. दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सरनोबतवाडी येथे स्थिर निरीक्षण पथकाकडून टोल नाक्यावर नाकाबंदी केली गेली आहे. यावेळी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान पोलिसांना तेथून जाणाऱ्या निळ्या रंगाच्या चार चाकी वाहनावर संशय आला. त्यावेळी या वाहनाची तपासणी केली. तेव्हा एका कापडी पिशवीत ७१ लाखाचे दागिने आणि हिरे आढळले. पोलिसांनी या दागिन्यांबाबत अधिक चौकशी केली तेव्हा विसंगती आढळून आली. यानंतर स्थिर निरीक्षण पथकाने सर्व दागिने जप्त करून कर्मचाऱ्यांसह ती चार चाकी व्हॅन राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणली जमा केली. त्यानंतर आयकर अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

पोलिसांनी आजपर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांच्या आसपास मुद्देमाल जप्त केला आहे. कोट्यवधी रुपयांची रोकड, सोने आणि मद्याचा एक कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. शिवाय 21 लाखांच्या बनावट नोटा ही जप्त केल्याचे पुढे आलं होतं.

पोलिसांनी पकडलेले दागिने कोल्हापुरातील एका ज्वेलर्सची असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पोलिसांनी याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही.