Coronavirus : संशयित रुग्णाची ‘कोरोना’च्या भितीने ‘आयसोलेशन’ वॉर्डातून उडी मारुन ‘आत्महत्या’

पंचकुला/हरियाणा : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने बरेच रुग्ण तणावग्रस्त परिस्थितीत जगत आहेत. पंचकुला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका संभाव्य कोरोनाबाधित व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्या व्यक्तीने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. हरियाणाच्या पंचकुला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संभाव्य कोरोनाबाधितांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार केले असून रुग्णांना या ठिकाणी दाखल करण्यात येते.

मृत रुग्णाला पंचकुला सिव्हील हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. आयसोलेशन वॉर्ड हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर असून या ठिकाणावरून रुग्णाने उडी मारली आणि संभाव्य कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. आत्महत्येच्या घटनेमुळे हॉस्पिटल परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, कोरना विषाणूची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर रुग्णांकडून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्ण किंवा संभाव्य कोरोनाबाधिकांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात 28 वर्षीय तरुणाने ग्रेटर नोएडामधील क्वारंटाईन सेंटरमधील सातव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. तो मानसिकदृष्ट्या आजारी होता.