‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा, केंदातील विरोधी पक्षावर शिवसेनची ‘स्तुतीसुमने’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे देशातील सद्यस्थितीवर राहुल गांधी यांनी सरकारला काही सल्ले दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेने सामना संपादकीयमधून राहुल गांधीवर स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा हे राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. कोरोनाबाबतचा ‘गांधी विचार’ देशात पोहोचवायला हवा असेही शिवसेनेने नमूद केले आहे.

राहुल गांधी यांनी कोरोनाबाबत घेतलेली भूमिका विधायक आहे. संकटकाळातील विरोधी पक्ष कसा असावा ते गांधी यांनी दाखवून दिले आहे. त्याचबरोबर अशा घोर प्रसंगी सरकार, तसेच विरोधी पक्षाने काय करावे याबाबत गांधींनी जणू ‘चिंतन शिबीर’च घेतले. त्या चिंतनाचा आदर केला तर देशाला फायदाच होईल. राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रवाद असू शकतात. तसे ते कोणाविषयी नाहीत ? पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविषयीदेखील आहेत.

भारतीय जनता पक्षाचे निम्मे यश हे राहुल गांधी यांच्या प्रतिमा भंजनातून मिळालेले यश आहे. हे भंजन आजही सुरूच आहे, पण ‘कोरोना’ युद्धात राहुल गांधी यांनी घेतलेल्या संयमी व जागरुक विरोधी पक्षाच्या भूमिकेचे कौतुक करावेच लागेल. देशातील संकटप्रसंगी विरोधी पक्षाने कसे वागावे, काय करावे याची आदर्श आचारसंहिता राहुल गांधी यांनी निर्माण केली आहे.

राहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाचा धोका आधीच ओळखला होता व त्याबाबत ते सरकारला सावध करीत होते. जेव्हा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यात सगळेच गुंतले होते तेव्हा गांधी कोरोनासंदर्भात सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. देशाला गरज असताना कोरोनाबाबतचे वैद्यकीय सामानसुमान निर्यात करणे थांबवा असे ते वारंवार सांगत होते. पण त्यांचे ऐकायचेच नाही हे सध्याचे सरकारी धोरण आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध देशाने एकत्र येऊन लढायला हवे, असे त्यांनी पहिल्या ‘लॉक डाऊन’च्या आधी सांगितले आणि पंतप्रधानांना आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे ठासून सांगितले अशी आठवण शिवसेनेने करुन दिली आहे.

माझे पंतप्रधान मोदींशी मतभेद असू शकतात, पण ही वेळ मतभेद उगाळत, भांडत बसण्याची नाही. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकदिलाने लढा द्यायला हवा. भांडत बसलो तर आपल्याला यश येणार नाही. . गांधी यांची ही भूमिका सर्वतोपरी देशहिताची, राजकीय शहाणपणाची आहे. पण सध्या शहाणपणाचा ठेका काही मोजक्या लोकांकडे आहे व त्यांना शहाणपणाचे अजीर्णच झाले असल्याने राहुल गांधी काय बोलतात याकडे पाहणे त्यांना कमीपणाचे वाटत असावे अशी टीका शिवसेनेने केली आहे.