‘ऑस्कर’कडून इरफान खानला आदरांजली, म्हणाले – ‘एक प्रेरणादायी अभिनेता हरपला’

पोलिसनामा ऑनलाईन – सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार ऑस्कर मानला जातो. हा पुरस्कार पटकावणार्‍याला जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या पंक्तीत स्थान मिळते. हा प्रतिष्ठीत पुरस्कार ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायंस’ या संस्थेमार्फत दिला जातो. या संस्थेने अभिनेता इरफान खानला श्रद्धांजली अर्पण केली आहे. बॉलिवूड सिनेसृष्टीने एक मोठा अभिनेता गमावला. ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘द नेमसेक’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने जागतिक स्थरावर आपल्या अभिनयाची छाप सोडली. लाखो लोकांसाठी तो प्रेरणा होता. आंम्हाला त्याची खूप आठवण येईल. अशा आशयाचे ट्विट करुन अ‍ॅकेडमी संस्थेने इरफान खानला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले आहे. त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. 53 व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर 2019 मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता. जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.