उस्मानाबाद जिल्हयात ‘कोरोना’चे नवे 3 रूग्ण, बाधितांची संख्या 10 वर

उस्मानाबाद :  पोलीसनामा ऑनलाइन  –  उस्मानाबाद जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नवीन 3 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर गेली आहे. कळंब तालुक्यातील २ तर भूम तालुक्यातील १ जणांचा आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील २८ जणांचे अहवाल तपासणीसाठी देण्यात आले होते. त्यापैकी २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात पूर्वी ४ रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी सापडलेले ३ रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्याने कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी धोका वाढला आहे. कळंब तालुक्यात सापडलेले दोन रुग्ण मुंबई येथून आल्याचे सांगण्यात येत आहे. तर भूम येथील रुग्ण देखील मुंबईतून आला असल्याचे माहिती समोर येत आहे. आता या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरणं करण्यात आले असून त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील एकुण 799 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 168, तुळजापूर 145, उमरगा 206, लोहारा 52, कळंब 145, वाशी 11, भूम 19, परंडा 53 अशा व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 748 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 28 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 17 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर १० कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्यापैकी ३ रुग्ण हे बरे झाले असून हे रुग्ण उमरगा तालुक्यातील होते. तर इतर ७ पैकी कळंब तालुक्यात ५ व भूम आणि परंडा तालुक्यात प्रत्येकी १ असे २ कोरोनाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.