उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 बार कायम स्वरूपी बंद..! महिला जिल्ह्याधिकाऱ्यांची धडक कारवाई

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन –  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली असताना देखील बार चालकांकडून दुकानेच उघडी ठेऊन अवैधरित्या दारू विक्री करण्यात आल्याने उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सील केले आहेत. आता कायम स्वरूपी त्यांचे परवाने रद्द केले आहेत. यात 8 बिअरबार आणि परमिट रूमचा समावेश आहे.

यात उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील हॉटेल पृथ्वीराज बिअरबार, ढोकी येथील हॉटेल शिरीन व सुर्या बिअरबार, कळंबतालुक्यातील शिराढोण येथील हॉटेल भक्ती बिअर बार, उमरगा तालुक्यातील डिग्गीरोड येथील हॉटेल प्राची, भूम येथील हॉटेल सचिन बार व लोहारा येथील जट्टे बिअर शॉपीचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. मद्याच्या पासेसच्या नोंदी न ठेवणे, परराज्यातील व गोवा निर्मित मद्य विक्री करणे शासनाच्या नियमांचे व अटींचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाने देशात देखील शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस याची संख्या वाढत आहे. राज्यात कोरणाची चिंताजनक रित्या वाढ होत आहे. दरम्यान राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवल्या आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र या काळात देखील उस्मानाबाद शहरात कळंब उमरगा तुळजापूर भुम परंडा वाशी मधील ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर अवैध दारू धंदे सुरू आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापुढे जे बार व परमिट चालक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अश्याच स्वरूपाची कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा उस्मानाबाद चे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांनी ही कारवाई केल्याने उस्मानाबाद जिल्ह्य़ातील बीअरबार व परमिट रुम चालकात चांगली खळबळ उडाली आहे.