उस्मानाबादची जागा काँग्रेसला सुटत असल्यास ‘यांना’ उमेदवारी द्या !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – उस्मानाबादची जागा काँग्रेसला सुटत असल्यास काँग्रेसने वैशालीताई देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी देशमुख कुटूंबियांकडून केली जात आहे तर दुसरीकडे काँग्रेसचा एक गट उस्मानाबाद येथुन शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी द्यावी म्हणुन प्रयत्नशील असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वैशालीताई देशमुख या राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पत्नी आहेत.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही एक-दोन जागेवर खळ सुरू आहे. त्यातच उस्मानाबादची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. मात्र, ही जागा काँग्रेसला सुटत असल्यास काँग्रेसच्या हायकमांडने या जागेवरून वैशालीताई देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी देशमुख कुटूंबियांकडून केली जात आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर आमदार अमित देशमुख, माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख यांनी लातूर आणि परिसरात काँग्रेस मजबुत करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना फारशे यश आलेले नाही.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत लातूरमधून भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. लातूर लोकसभा मतदार संघ हा राखीव असल्याने तेथुन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना लढता येत नाही. सलग 7 वेळा लोकसभेवर गेलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांना सन 2004 मध्ये लातूर लोकसभा मतदार संघातून पराभव स्विकारावा लागला होता. तेव्हापासुन ते सक्रिय राजकारणापासुन दूर आहेत. उस्मानाबादची जागा काँग्रेसला सुटत असल्यास देशमुख आणि चाकूरकर गट समोरासमोर असतील असे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहेत. दरम्यान, अद्यापही उस्मानाबादची जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला सोडण्यात आलेली नाही.