आत्म्याला शांती मिळावी म्हणून 6 वर्षांच्या मुलाचा नरबळी, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ! सख्ख्या नातेवाईकांचा समावेश

उस्मानाबद : पोलीसनामा ऑनलाईन –   उस्मानाबद जिल्हा सत्र न्यायालयानं कळंब तालुक्यातील डोळा पिंपळगाव येथील बहुचर्चित नरबळी प्रकरणात 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कळंब तालुक्यातील पिंपळगावात 2017 साली 6 वर्षीय कृष्णा इंगोले या चिमुकल्याचा नरबळी देण्यात आला होता. राज्यात मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलं होतं. या प्रकरणात चिमुकल्याच्या सख्ख्या आत्यासह चुलता, चुलती, आजोबा आणि पुण्यातील मांत्रिकाला अटक करण्यात आली होती. साडे तीन वर्षांमध्ये उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयात विविध साक्ष आणि युक्तिवाद झाले. अखेर शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम जी देशपांडे यांनी निकाल दिला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मयत कृष्णा हा 26 जानेवारी 2017 रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून शाळेतून त्याच्या पिंपळगाव (डोळा) येथील घरी आला होता. घरी आई नव्हती म्हणून तो घराबाहेर खेळत होता. मात्र नंतर अचानक तो गायब झाला. दिवसभर शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. मयत कृष्णाची आई सारीका इंगोले यांनी कृष्णा बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि 27 जानेवारी 2017) सकाळी 11 च्या सुमारास कृष्णाचा मृतदेह शेतात सापडला. कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक डी डी बनसोडे यांनी याचा तपास केला. त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक नेवसे यांनी केला.

मयत कृष्णाची सख्खी आत्या द्रौपदी पोळ हिनं त्याला बोलवून घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्याला आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागली विहिरीवर दाट झाडीत नेलं. त्याच ठिकाणी द्रौपदी हिनं इतर आरोपींच्या मदतीनं कृष्णाचा खून करून नरबळी दिल्याचं उघड झालं. आरोपी उत्तम इंगोले यांची मयत चुलत बहिण कडुबाई तसंच आरोपी साहेबराव इंगोलो याची मयत पत्नी यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचा आत्मा भटकून नये असं कारणही देण्यात आलं होतं.

पुण्यातील आरोपी मांत्रिक राहुल उर्फ लखन चुडावकर आणि सुवर्णा भाडके यांनीच आरोपींना सल्ला दिला होता की, आत्म्याला शांती मिळावी यासाठी रक्ताच्या नात्यातील मुलाचा नरबळी द्यावा लागेल. घटनेच्या आधीपासूनच आरोपी उत्तम व पत्नी उर्मिला हे सर्व कुटुंबासह पुण्यात वास्तव्यास होते. त्या ठिकाणी मांत्रिक आरोपीची ओळख झाली होती. सर्व आरोपी पिंपळगाव येथे अमावस्या, पौर्णिमेला पूजा करण्यासाठी यायचे.

घटनेच्या 15 दिवसआधी पिंपळगाव येथे येऊन आरोपींनी कट कारस्थान करून कृष्णा याचा नरबळी देण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांनी आरोपी उत्तमच्या घराशेजारी खड्डा खोदून त्या ठिकाणी मयत कडुबाईची समाधी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला. या प्रकरणात आरोपी आणि मयत यांना एकत्र पाहणारा साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, आरोपीच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग व टॉवर लोकेशन, कराड येथील मुर्तीकार, समाधीचे बांधकाम घेणारा गुत्तेदार, आरोपी लखनचा मित्र यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

दरम्यान या प्रकरणातील काही महत्त्वाचे साक्षीदार असेही होते जे फितूर झाले होते. गुन्हा पाहणारा असा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासात निष्पन्न झाला नव्हता. मात्र कृष्णाच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर घडलेल्या छोट्या छोट्या घटनाची साखळी परिस्थितीजन्य पुरावा पूर्ण करण्यात सरकारी पक्षाला यश आलं. अतिरीक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद न्यायालयानं ग्राह्य धरून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

You might also like