वैतागलेल्या शेतकऱ्याचा ऊस जाळण्याचा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन- उस्मानाबादमधील शेतकरी साखर कारखानदार आणि ऊसटोळीच्या वाढत चाललेल्या अन्यायामुळे मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे. उस्मानाबादमधीलच  वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ऊस पेटवून देण्याचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्याचं ठरवलं आहे असंही समजत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी वर्षभर ऊस सांभाळला त्याच शेतकऱ्यांवर तो ऊस पेटवून देण्याची परिस्थिती आेढावली आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उस्मानाबादमधील 60 शेतकऱ्यांनी शेतातील ऊस पेटवून देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस पेटविण्याचा कार्यक्रमास उपस्थित रहावे, असं निमंत्रण त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

एकीकडे कारखानदार  शेतकऱ्यांवर अन्याय तर करतात तर दुसरीकडे ऊसतोड टोळीचालाकांचा मुजोर कारभारही शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावर कोणाचाही लगाम असल्याचे दिसत नाही. ऊस न्यायचा झालाच तर टोळीचालकांकडून वाटेत त्या किंमतीची मागणी केली जात आहे. एकरी सहा हजार रुपये त्यानंतर प्रत्येक खेपेला पाचशे रुपये अशा प्रकारच्या मागण्या होताना दिसत आहे. टाेळी चालकांच्या या भीतीने ऊस नेला नाही तर ऊस वाळून जात आहे. कारखानदार ऊस घेऊन जात नसल्याचेही पाहायला मिळत आहे.

आधीच पावसाचं प्रमाण कमी आहे. त्यातही ऊसाचं पीक म्हटलं की त्याला पाणी भरपूर लागतं. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसाची योग्य ती वाढ झाल्याचे दिसत नाही. अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी कर्ज काढून ऊसाचं पीक जगवल्याचं दिसत आहे. आता कारखानदार वेळेत ऊस घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पेटवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्याचं ठरवलं आहे.